Wednesday, December 1, 2010
काळेवाडीचे बुद्धिबळ
काळेवाडी आघाडीत बुद्धिबळ हा खेळ फार आवडीने खेळला जातो. कोणाला त्यातील 'बुद्धी' आवडते तर कोणाला 'बळ' तर काहींना उगाचच आवडतो.
सुरुवात नानगुडे पाटील-देशमुखांपासून करूयात. यांना केवळ 'पाटील' म्हटलेले आवडत नाही, त्यामुळे 'पाटील-देशमुख' असे double barrel लावाव लागत. असो. तसे निखील नानगुडे पाटील देशमुख आणि बुद्धिबळ हे विरुद्धार्थी शब्द. ह्या नावाला शोभणारे खेळ म्हणजे कुस्ती, मुष्टियुद्ध किंवा मारामारी!! बुद्धिबळ आणि यांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे 'बळ'. ते कशाचेही असले तरी चालेल असे म्हणून ह्यांनी पट मांडला. पाटलांची आवडती सोंगटी म्हणजे 'हत्ती'. त्याचा आकार, शक्ती, सरळ चाल सगळेच ह्यांना प्रिय. पटावरच्या बाकी सोंगट्या मग तो राजा असूद्यात किंवा वजीर हे सगळे बिनकामी आहेत, असे पाटलांचे ठाम मत आहे. ह्यांच्या मते पटावरच्या अक्ख्या ३२ सोंगट्या हत्तीच्याच जाती असाव्यात. मग काय, नुसती हाणामारी, मारधाड आणि ती पण समोरासमोर! यांचा खेळतानाचा आवेश भयंकर असतो. त्याची नुसती झलक हवी असेल तर लगान मधला 'बाघा' आठवा. अगदी युद्धभूमीवरची वीरश्री संचारते. 'हान त्या घोड्याला', 'तोड तांगडे त्या उंटाचे', 'टाक चिरडून त्या प्याद्याला' आणि हे सगळे फक्त हत्तीनेच केले पाहिजे हा नियम. प्रत्येक चालीत हाणामारी हवीच. 'We make our own roads' म्हणत अगदी सरळ बघत सदा स्वारीवरच असतात. कधी कधी उंटासारखे तिरपे कटाक्ष टाकून प्रेक्षणीय स्थळ न्याहाळतात, पण लगेच ह्यांच्या कानात म्हणे हनुमान 'चालीसा' सुनावतात. कोणास ठाऊक कानात वाजते का कानाखाली वाजते. तर असे हे आमच्या काळेवाडीचे दणदणीत शूरवीर सरदार.
झोरदार ना!! आत क्रांतिकारी खेळपद्धती कडे वळूयात. सर्वप्रथम 'लाल सलाम'. सलामाचे खरे मानकरी आहेत अनिकेत भावठानकर उर्फ Martin 'Latur' king उर्फ मराठवाड्याचे Marx उर्फ Kalewadi proletariat . तूर्तास फक्त भाऊ. यांना मुळी ह्या खेळाची संकल्पनाच मान्य नाही. काळा राजा, पांढरा राजा, यांच्यातील ही लढाई हा सगळा श्रीमंताचा कट आहे असे यांचे म्हणणे आहे. समाज दोन गटात विभागलेला असतो खरा, पण बुद्धीबळातल्या सारखा नाही. एक गट असतो तो Bourgeois लोकांचा, म्हणजे राजा, वजीर, घोडा, उंट यांचा. तर दुसरा केवळ Proletariat प्याद्यांचा. भाऊच्या 'historic analysis ' नुसार या खेळत रक्त फक्त प्याद्यांचेच सांडले जाते आणि ते पण राजासाठी. त्यामुळेच भाऊने क्रांतिकारी संकल्पना मांडली आहे - 'विद्रोही बुद्धिबळाची'. यात एका बाजूला असतील bourgeois तर दुसऱ्या बाजूला proletariat प्यादी. यात bourgeois चा रंग कुठला पण चालेल पण प्याद्यांचा रंग फक्त लालच हवा. यातून भाऊला एक रक्तरंजित क्रांती अपेक्षित आहे. यातून प्याद्यांचे राज्य निर्माण होईन आणि खेळाची काही गरजच उरणार नाही. हा रक्तरंजित क्रांतीचा प्रकार सरदार नानगुडेना फारच आवडला कारण, मारामारी!!
सीमावर्ती बेळगावच्या मैत्रेय कुळकर्णीला वजिराचा भारी राग. त्याच्या खेळण्यातले स्वारस्य म्हणजे पटावरच्या दोन राण्या, मग ती काळी असो व गोरी. या इसमाची थोडक्यात ओळख म्हणजे याचे आतापर्यंत ३६ लफडी, २७ प्रकरणं, १२ इंग्रजीतल्या commitments झाली आहेत. सध्या १ engagement होऊ घातली आहे. अंदाज आलाच असेल. गोड गोड बोलून अख्खा पट फिरवतो. राण्यांच्या जितके जवळ जातं येईन तेवढे जातो. मग त्यासाठी प्यादी मरोत अथवा राजा. याला त्यांच्याशी काहीही घेणे-देणे नाही. याचे ध्येय एकच - राणी, क्षमा करा राण्या! सध्या यांनी असाच एक पट मसुरीत मांडला आहे. आणि लवकरच युगांडा आणि बुर्कीना फासो येथे मांडणार आहेत.
या सगळ्यांच्या उलट स्वच्छंद खेळणारा पवन बढे. नावासारखाच मुक्त, स्वच्छंद! हा एकचाल पुण्यात खेळतो तर दुसरी चाल हरिश्चंद्र गडावरून, तिसरी लडाखला ..... शंभरावी अरुणाचल प्रदेशातून .... एक सहस्त्रावी निलगिरी पर्वतावर. हा असाच खेळत राहतो. याचे खेळायचे नियम म्हणजे १. प्रत्येक चाल bike वर बसूनच खेळणार. २. पायात sport shoes पाहिजेतच. ३. हातात जळणारी काडी आवश्यकच. ४. खेळत असंख्य राण्या हव्यात. इत्यादी इत्यादी. बऱ्याच चाली Jet Stream सारख्या झिंगत-विळखे घेत असतात. पण हा कोणालाही हरवत नाही आणि जिंकवत पण नाही. त्यामुळे पटावरचे सोंगटी खूष! त्यातल्या त्यात राण्या जास्तच खूष. म्हणजे हा ठेवतो त्यांना, एकदम आल्हाद. सध्या हा मुक्त वारा पण कुळकर्ण्याच्या गोड गोड बोलण्यात फसून विरक्तीच्या मार्गाला आहे असे ऐकिवात आहे. म्हणजे कुलकर्ण्यांनी पट मोकळा करून घेतलेला दिसतोय.
अभिजित गुरव. राजा माणूस. अगदी खऱ्याखुऱ्या राजाला शोभून दिसणारे व्यक्तिमत्त्व. तोच रुबाब! तीच मिजास! तोच भारदस्त पणा! तोच डौल! तरुणींच्या काळजाचा ठेका चुकवणाऱ्या मिश्या!! ( ह्याच मिश्यांना पाहून म्हणे काझीरंग्यातल्या एक शिंगी गेंड्याने पळ काढला होता. त्यावेळेस राजे हत्तीवर विराजमान होते. गेंडा नक्की मिश्यांना घाबरला का हत्तीला यावर इतिहासकारांमध्ये अजूनही वाद चालू असल्याचे ऐकिवात आहे). असो. जहांपन्हा जेंव्हा बुद्धिबळ खेळतात तेंव्हा पटावर एकच राजा असतो, दस्तुरखुद्द जहांपन्हा!! यांच्या चाली अगदी पटावरच्या राजासारख्याच. एक चाल पुढे, एक मागे, एक उजवीकडे, एक डावीकडे! चाल जरी एका घराची असली तरी नजर ६४ घरांवर गिरक्या घेत असते. सावज हळूच टिपत असते. मग चाली रचल्या जातात. अख्खा पट गदागदा हलायला लागतो. सारा पट मग यांच्यासाठीच लढतो, जिंकतो आणि हरतो देखील. संपूर्ण पाटावर यांचीच हुकुमत! जहांपन्हांच्या नजरेचा एकेक कटाक्ष हत्ती, वजीर, घोडे, प्यादे यांना 'बेहोश' करून सोडतो. याच बेहोशीत सोंगटी जिंकतात, शत्रू नामोहरम होतो. इतका की पराभवात ही तो आत्मज्ञानाने नाचायला लागतो. मृत्यूसमीपही सोंगट्याना आत्म्याचा शोध लागतो. त्यांची शरीरे केंव्हाच डब्ब्यात जाऊन पडलेली असतात, आत्मा मात्र अनंतात विलीन होऊन स्वर्गाकडे प्रस्थान झालेला असतो. जिंकणारे पण असेच 'धुंद' होतात. त्यांना ना विजयोन्माद असतो ना आसुया. जहांपन्हांच्या सान्निध्यात सगळ्यांनाच ब्रम्हानंदी टाळी लागते. तर असे हे आमचे प. पू. ह. भ. प. अभिजित राजे!!
कोल्ह्यासारखे धूर्त, लांडग्यासारखी लबाडी, मैत्रेय इतकाच गोडबोल्या, जहांपन्हांचीच मिजास! अंदाज आलाच असेल. हो तोच तो. नितीन येवला साहेब उर्फ नाशिकचे Dy SP . ह्यांच्या धूर्तपणाचे अनेक वेगवेगळे किस्से अनेक वेगवेगळ्या लोकांना माहित आहेत. यांचे जर संकलन केले तर IIMA 'Reliance ' किस्से सोडून ह्यांचेच पराक्रम 'case study ' म्हणून शिकवतील. असो. तसा ह्यांना बुद्धिबळात खेळात रस नाही. पण लोकाग्रहाखातर आपल्या बुद्धीची चुणूक दाखवण्यासाठी मांडतात पट ! मग सुरु होतो एक असामान्य खेळ. 'creative destruction ' फेम भगवान श्रीकृष्ण, द्यूताचा महारथी शकुनी, 'ध.मा.' आनंदीबाई, शेकसपीअरच्या ऑथेल्लो मधला इआगो किंवा ओंकाराचा 'लंगडा त्यागी', बारा मती फिरवणारे साहेब, matrix चा agent Smith सगळेच आवासून खेळ बघतात. सोंगट्या, प्रेक्षण सारेच गोंधळून जातात. सोंगट्या म्हणतात आपण खेळतोय नक्की कोणासाठी. प्रेक्षण म्हणतात काळा वजीर पांढऱ्या राजाला सोडून काळ्याच राजाला का 'चेक' देतोय? सोंगटी, प्रेक्षक गरगरतात. खेळ रंगतदार अवस्थेत पोहचतो. असंख्य बळी जातात, असंख्य विमनस्क होतात. निकाल काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण ह्यांच्या पटाचे निकाल इतक्या लवकर कळतच नाहीत. ती कळायला तितकेच असामान्यत्व लागते किंवा काळच काही दिवसात सारे काही स्पष्ट करतो. श्रीकृष्णाला तरी कुठे अंदाज होता त्याने रचलेल्या गीतेतून महाभारत घडेल आणि घडतच राहील! सध्या हे दिल्लीत काहीतरी वेगळीच 'गीता' रचत आहेत, बघुयात कलियुगात काय महाभारत घडवतात ते!
नुकताच काळेवाडी आघाडीत एक चंचुप्रवेश झालं. गोदावरीच्या कुशीतल्या गोंडवन भागाचा शिवकुमार उर्फ शिवा. सध्या तरी हा काळेवाडी बुद्धिबळात नवीन आहे, त्यामुळे याचा वावर प्याद्या सारखा असतो. पण बाज असा की अगदी राजा सुद्धा ह्याचे रक्षण करण्यात मागे-पुढे पाहायचा नाही. हळू हळू हे प्यादे एकेक घर पुढे जात आहे. ७ घरे ओलांडून हा वजीर होणार, हे निश्चित!
इति श्री काळेवाडी बुद्धिबळ आख्यान संपन्नम!!
Monday, September 13, 2010
काळेवाडीचा पुणेरी पाहुणचार(?)
पाचचा गजर झाला आणि नानगुडे पाटील उठले. अंघोळ करून त्यांनी हनुमान चालीसा वाचली आणि अभ्यास चालू केला. साडेसात-आठच्या सुमारास अभ्या उठला. थोड्या वेळ gallery मध्ये जाऊन त्याने आजूबाजूला नजर टाकली. (का म्हणून विचारू नका.) हळूहळू काळेवाडी आघाडी जागी झाली. (तशी ती चोवीस तास जागी असते कारण जहापन्हा पहाटे कधीतरी झोपतात.)
मग नऊ वाजता बंगाना जाग आली. बंगानी थोडा वेळ पडल्या पडल्या विचार केला आणि मग पंख्याकडे नजर टाकली. (ती त्यांची खासियत आहे.) शेवटी बंगानी आता उठायला पाहिजे असा निर्णय घेतला. बंगांनी अंघोळ उरकून घेतली व खोलीला कडी लावून आतमध्ये रामरक्षा वाचायला चालू केली. (आतमध्ये मी रामरक्षा वाचतो असा बंगांचा दावा आहे. खरे खोटे माहित नाही.)
सगळ्यात शेवटी म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर, लोकांची अर्धी कामे झाल्यावर अभ्याची Gym उरकल्यानंतर नानगुडे पाटलांचा अभ्यास करून व orkut-facebook सहित सर्व बघून झाल्यानंतर, बंगांचे सगळे पेपर वाचून झाल्यानंतर जहापन्हा उठले. तोपर्यंत १२:३० झाले होते. जहापन्हानी आरश्यात बघत केस ठीकठाक करून आपण माणसात आलोय याची खात्री करून घेतली. त्यानंतर जहापन्हा बाहेर येऊन पेपर वाचत बसले. पाच-दहा मिनिटानंतर अभ्याची करडी नजर जहापन्हावर पडली. आणि जहापन्हा समजले कि सगळी मंडळी जेवणासाठी थांबली आहेत. जहापन्हानि पेपर सोडला आणि दात घासण्याचा ब्रश हातात घेतला.
जेवण करत असताना अभ्याच्या मोबाईल वर तबला वाजला (तबल्याची ringtone हो...) अभ्याने फोन उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या प्रयत्नात UPSC-prelim पास व्हावी तसा आनंद झाला. त्याच कारणही तसं खासच होत. सदाशिव पुणेकर हा आमचा एक नंबरचा चिकट मित्र. कधी स्वताच्या पैशाने चहा म्हणून पाजला नाही. उलट बिल द्यायची वेळ आली आहे हे त्याला अंतर्ज्ञानाने अचूक समजत (पुणेकरांना सगळ्या गोष्टीच उपजतच ज्ञान असत म्हणा..पुणे तिथे काय उणे) आणि हा फोन आल्याचा बहाना करून बरोबर सटकतो. तर ह्या सदाशिव पुणेकरान आम्हाला चक्क घरी जेवायला बोलावलं होत. घोरपडी का काय असलाच प्राण्याच नाव असलेल्या ठिकाणी त्याने नवीन घर घेतलं होत.
दुसऱ्या दिवशी काळेवाडी आघाडीचे सदस्य खुशीतच होते. आज संध्याकाळीच जेवनाच निमंत्रण होत. दुपारच्या जेवणात मावशींना फक्त वरण भात सांगण्यात आला. संध्याकाळी पाच वाजता काळेवाडीचे चार सदस्य - अभ्या, बंग, जहापन्हा आणि नानगुडे पाटील हे घोरपडीला जाण्यास निघाले. नानगुडेनची सफारी गाडी काळेवाडी च्या दिमतीला असल्यामुळे कसे जायचे हा प्रश्न नव्हता. प्रथम आम्हाला कोथरूडला जायचे होते. कारण काळेवाडीचा माजी सदस्य भाऊ(उर्फ मराठवाड्याचा Marx) सध्या तिथे राहतो. तोही आमच्या सोबत येणार होता.कोथरूडवरून भाऊला घेऊन आमची स्वारी घोरपडीला निघाली. कॅम्पात पोहोचेपर्यंत प्रवास सुरळीत झाला. तिथे मात्र एका वळणावर आल्यावर डावीकडे जायचे कि उजवी कडे असा पेच पडला. तिथे भाऊने Marx ची two class theory मांडली. डाव्या बाजूला झोपडपट्टी होती त्यामुळे उजव्या बाजूला capitalist क्लास रहात असावा असा निष्कर्ष भाऊने काढला. पण आमचा मित्र मध्यमवर्गात मोडत असल्या मुले व Marx च्या तत्वज्ञानात मध्यम वर्गाला स्थान नसल्यामुळे भाऊला हि theory मागे घ्यावी लागली.
आपण पुण्यात फार वर्षे राहतो त्यामुळे कुणाला पत्ता विचाराने हे कमीपणाचे लक्षण आहे अस मानून आम्ही कॅम्पात डावी उजवी वळण घेत राहिलो. अर्ध्या तासानंतर अस लक्ष्यात आल कि आपण पुन्हा त्याच ठिकाणी परत आलो आहोत.
थोड्या वेळाने जहापन्हांच्या अस लक्ष्यात आल कि बंग हे घोरपडीला एकदा जाऊन आले आहेत. बंग कुठे आहेत याच्या शोध घेतल्यानंतर अस लक्ष्यात आल कि बंग हे गाडीच्या मागच्या सीट वर निवांत झोपले आहेत. पण गाडी थांबल्यामुळे तेही खडबडून उठले. बंगानी दिशादर्शनाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मात्र आमची स्वारी सुरक्षितपणे घोरपडीला इच्छितस्थळी जाऊन पोहचली.
घराच्या परिसरात गाडी पार्क करून काळेवाडीचे सदस्य उतरले. तोपर्यंत संध्याकाळचे साडेसहा झाले होते. समोरच्या रस्त्यावरून जाणारी सौंदर्यस्थळे जहापन्हानी अचूक हेरली व त्यावर भाऊशी तपशीलवार चर्चा चालू केली. नानगुडे पाटलांनी चालता चालता 'या बिल्डिंग चे गेट जर थोडे मोठे असते तर आपल्याला ट्रक आणता आला असता यावर अभ्याशी वाद घालायला चालू केला. त्यावर बंगांनी 'आपण ट्रक घेऊन कशाला येणार असा प्रतिप्रश्न करून नानगुडेना निरुत्तर केल.
घरी पोहचल्यावर आमच्या मित्राने आमचे मोठ्या प्रेमाने(? बहुतेक) स्वागत केल. थोड्यावेळाने आम्हाला त्याने घर दाखवायला चालू केल.नवीन घर घेतलेल्या लोकांना भेटताना तुम्हाला हे ऐकून घ्यावंच लागेल ते म्हणजे : 'आपला बिल्डर कसा दुष्ट आहे आणि तरीपण आपण त्याला कस गंडवल . मग rate कसा कमी केला, घर स्वस्तात कस मिळाल... पार्किंग space कशी मिळाली ... हाच मजला कसा बेस्ट आहे वगैरे वगैरे . सदशिवाने पण gallery कशी spacious आहे , kitchen मध्ये कशी छान हवा येते वगैरे तांत्रिक बाबी सांगितल्या. शेवटी एकदाचे घर बघण्याचे सोपस्कार पार पाडून आम्ही hall मध्ये येऊन बसलो.
मग काकुनी आम्हाला 'पोहे खाणार का ? अस विचारलं.
पहिल्यांदा लगेच होय कस म्हणायचं या रीतीरिवाजानुसार आम्ही 'नको-नको -कशाला' अस करू लागलो.(अर्थात पोहे खाल्यानंतर जेवण कमी जाईल हा सुज्ञ विचार त्यामागे होताच)
तरीही पोहे खायला हरकत नाही अस एकंदर आमच मत बनत चालल होत. पण एवढ्यात सदाशिव पटकन म्हणाला 'अरे पोहे नाही अर्धा कप चहा तरी घ्या'. त्यावर भाऊने चपळाई दाखवत 'हो चहा चालेल' अस म्हणून होकार देऊन टाकला. आणि थोड्या वेळात आमच्यासाठी अर्धा अर्धा कप चहा आला. (यालाच कदाचित half tea diplomacy म्हणत असावेत!!!!)
चहासोबत गप्पा मारता मारता साडेसात होऊन गेले..............
<पुढे चालू>
सर्व मंडळींचे लक्ष नाही म्हंटले तरी किचेन कडे होतेच. थोड्या वेळाने आमचा मित्र आलोच हं एका मिनिटात म्हणून आत गायब झाला. पाच-दहा मिनिटे अशीच गेल्यावर मात्र आतून फोडणीच्या आवाजापाठोपाठ फोडणीचा वासहि दरवळला. मग मंडळी थोडी relax झाली. भाऊ ला कोपऱ्यात ठेवलेली काही पुस्तके दिसली आणि भाऊ ती चाळण्यात मग्न झाला. अभ्या व जहापन्हा gallery त जाऊन रस्त्यावरच्या लोकांना न्याहाळू लागले. बंगानी बाजूचा pune times उचलून वाचायला (? कि बघायला) चालू केला. तर नानगुडे पाटलांना कुठेतरी कोपऱ्यात एका सुडौल शरीरयष्टीचा फोटो दिसला(पुरुषाचा.. उगीच नसत्या कल्पना नको) व तो पाहण्यात ते दंग झाले.
आठ वाजून गेले. हा मित्र हि आतच गायब होता. आता मंडळींच्या position हि बदलल्या होत्या. नानगुडे पाटील पुस्तक वाचक होते तर बंग body builder ला बघण्यात दंग झाले. भाऊ gallery त पळाला तर अभ्या आणि जहापन्हा नुसतेच शून्यात नजर लाऊन बसले होते. tv वरच्या मराठी मालिकांचे स्वर आतून ऐकू येऊ लागले होते. 'चला आता जेवायला घ्या' हे उत्साहवर्धक शब्द ऐकायला सर्व जण अधीर झाले होते. साडेआठला सदाशिव बाहेर आला(अरे वाह). 'अरे sorry बरका. फोनवर बोलत होतो' - इति सदाशिव. 'बर माझे ट्रेकचे फोटो दाखवतो तुम्हाला'. आमच्या मित्राला कुठेतरी डोंगरावर कानाकोपऱ्यात अडचणीच्या जागी चढून जायची व आपण तिथे गेलो होतो हे दाखवण्यासाठी तिथले फोटो काढायची आवड होती (त्यालाच काही लोक ट्रेक असहि म्हणतात). तर हे ट्रेक चे फोटो दाखवण्याचा कार्यक्रम बराच वेळ लांबला. आम्ही पण 'अरे वा' 'छानच' ' मस्त आहे' 'सहीच' अस काहीतरी उगीच बोलायचं म्हणून बोलत होतो. आता tv वर मराठी मालिकांच्या जागी सासबहुच्या हिंदी serial लागल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आम्हाला मग लक्षात आल कि आपली काहीतरी गफलत झाली आहे. थोड्या वेळाने मग आता परिस्थितीचा अंदाज घ्यायचा म्हणून जहापन्हानि एक खडा टाकून पाहिला.
'बराच उशीर झाला आहे आम्हाला निघायला' - जहापन्हा
'हो माझ्या लक्षातच आल नाही.. उगीच तुम्हाला फोटो दाखवत थांबवून ठेवलं, या पुन्हा असेच निवांत' - इति सदाशिव
आता मात्र सगळ्या मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे झाले झाले. अभ्यानेच फोन वर निमंत्रण स्वीकारले होते त्यामुळे सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. त्याने चेहऱ्यावर आता बाहेर जाऊन काय असेल ते settle करू असा भाव आणला. मग निरोप घेऊन आम्ही बाहेर निघालो. निघता निघता काकू म्हणाल्या 'जेवायला थांबला असता तर बर झाल असत..'
कदाचित 'जेवायला' याच्यापुढचे शब्द जहापन्हा नि ऐकले नसावेत ते तसेच पादत्राणासहित आत जायला निघाले पण नानगुडे पाटलांनी बाका प्रसंग ओळखून त्यांना मागे खेचले.
काळेवाडीचे सदस्य मग आपल्या कार्यालयात परत आले आणि रात्री खिचडी भात करून त्यांनी आपली भूक भागवली.
मित्रानो या अनुभवातून आघाडी बरीच शहाणी झाली आहे. आघाडीने असे बाके प्रसंग इतर लोकांवर ओढवतील याची सामाजिक जाणीव (याबाबतीत काळेवाडी नेहमी आघाडीवर असते म्हणूनच 'काळेवाडी आघाडी' असे नाव आहे ) ठेवून काही नियमावली तयार केली आहे.
१. कोणत्याही पुणेकराचा तुम्हाला जेवणाचे आमंत्रण देणारा फोन/इमेल/अन्य आल्यास स्वताला चिमटा काढून आपण स्वप्न तर पाहत नाही ना याची खात्री करावी. समोर कोणी असल्यास त्याला चिमटा काढायला सांगणे उत्तम...
२. इतके केल्यानंतर पुन्हा जाताना एकवार फोन करून त्याच वर्षाच्या दिवशीचे निमंत्रण आहे का हे पडताळावे.
३. कुणाही पुणेकराच्या घरी गेल्यानंतर काही हवे का म्हणून विचारले तर पटकन हो म्हणावे अन्यथा पाणी सुद्धा मिळणे दुरापास्त होईल.
विशेष सूचना - वरील कथा पूर्णपणे काल्पनिक असून त्यातील पात्रे मात्र वास्तव जगातील आहेत. तसेच या लेखामुळे कोणत्याही पुणेकराच्या व प्राणी संघटनेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याला काळेवाडी आघाडी जबाबदार असणार नाही. तसेच याबाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
सर्व हक्क @काळेवाडी आघाडी
Thursday, August 19, 2010
पुढचा टप्पा गाठला .....
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि,आमचे येथे ४ मित्रांनी सनदी सेवेची प्रारंभिक पायरी सर केली आहे ...
मजल दरमजल करत ते २९ ऑक्टोबर ला पुढच्या युद्धावर रवाना होतील , तरी आपल्या शुभेछा रुपी रसदीची
गरज भासेल तरी आपण त्यासाठी त्वरेने पावले उचलण्याचे करावे ...
आपला नम्र
अनिकेत उर्फ भाऊ
मजल दरमजल करत ते २९ ऑक्टोबर ला पुढच्या युद्धावर रवाना होतील , तरी आपल्या शुभेछा रुपी रसदीची
गरज भासेल तरी आपण त्यासाठी त्वरेने पावले उचलण्याचे करावे ...
आपला नम्र
अनिकेत उर्फ भाऊ
Thursday, July 29, 2010
आघाडीतले दिवस
तसा हा ब्लोग उघडून बरेच दिवस झाली. पण विषय सापडत नव्हता. कशापासून चालू करावे? आलेल्या अनुभवांनी का UPSC च्या गमती जमातींनी, का मार्गदर्शन ब्लोग म्हणून! अर्थात मार्गदर्शनासाठी महामहीम नितीन येवला आणि मैत्रेय कुलकर्णी यांनाच पाचारण करावे लागले असते. कारण या दोघानीच काळेवाडी आघाडीला अगदीच वैश्विक नाही पण 'काहीतरी' स्वरूप दिले आहे. आत 'काहीतरी' चा अर्थ पुणेरी घेऊन नये. काळेवाडी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, म्हणजे मी अभिषेक मधुकर चौधरी, परभणीचे असल्यामुळे त्याचा अर्थ सरळ सरळ घ्यावा. पण पुणेरी प्रभाव मात्र लक्षात घ्यावा. असो. तर ब्लोग चा शुभारंभाचा प्रश्न कुलाकर्ण्यानीच सोडवला... आपल्या खास शैलीत आपले 'काळेवाडी' दिवस त्यांनी रंगवले आहेत. तरी काळेवाडी आघाडीच्या तमाम चाहत्यांनी याचा आस्वाद घ्यावा व असेच आपले उदंड आशीर्वाद आघाडीला द्यावेत...
तर सादर करीत आहोत, अभिषेक चौधरी प्रकाशित, मैत्रेय कुलकर्णी लिखित 'आघाडीतले दिवस'...
अजूनही आठवते डांगे चौकातली ती पहाट
एका मिणमिणत्या दिव्याखाली बस सोडून गेली होती.
कुठूनसा येऊन अभ्या उचलून घेवून गेला होता
एका अफाट अध्यायाची ती सुरुवात होती.
"B -१०२, निसर्ग सृष्टी" हा पत्ता तेव्हा देखील
डाक घरावर सोपस्कार म्हणूनच उरला असावा.
राज्यशास्त्रावर राज्य गाजवलेल्या त्या ' काळेवाडी आघाडी' त
माझा आधी बाहेरून पाठिंब्याचा, मग सदस्यत्वाचा योग होता.
फाट्यापासून गुड मॉल - आणि तेथूनही मैलभर आत
वाटेत नित्याचा प्रिय लौंड्रीवाला, गेट आणि स्विमिंग पुला भोवतीची सोसायटी.
शेकडो वेळा तुडवलेली ही वाट- कधी क्लाससाठी, कधी भाजीसाठी, कधी भज्यांसाठी
कधी राजस्थान्याच्या डाळ-वाटीसाठी आणि जवळपास रोज कोपऱ्यावरील बदाम शेकसाठी.
'स्वच्छंद'पणे अभ्यास करण्याच्या या प्रशस्त ठिकाणच्या भिंतींवर
नकाशांपेक्षा मोठा आमचा 'सौंदर्याचा' कोलाजच होता!
अभ्यासाच्या जागा ठरलेल्या तरीही कोणी नुसत्या फेऱ्या मारायचा,
कोणी किचन मध्येच असायचा अन कोणी सारखा ग्यालरीत पळायचा.
तिथल्या वस्तू आणि त्यांच्या ठेवणीतही काहीतरी विशेष होतं
एकमेकांना बडवण्यासाठी एखादा फोमचा बॉल लगेच हाती लागायचा.
वॉशिंग मशीन नुसतं धिंगाणा घालायचं, दही/भाजी/रसनासाठी अख्खा फ्रीज सुरु असायचा
आणि घरातल्या टोस्टरवर तर नित्याचा जीव उतू जायचा!
पण हे सगळं बाजूला सारून जेव्हा अभ्यास सुरु व्हायचा
भाऊच्या पाठीमागं जणू मार्क्सच उभा राहायचा!
अभ्या मग प्रतिहल्ला चढवायचा, मी-नित्या नसते फंडे मारायचो..
आणि विं.दां.च्या कवितांनी भाऊ मैफिलीत ' जान ' आणायचा!
नित्या-अभ्याच्या वाद-प्रतिवादाचा आनंद
मी, भाऊ, शेहेनशहा , बंगांनी अनेकदा घेतला असेल.
' पॉलीटिकल थेरी ' मध्ये आम्ही इतका दंगा घातलाय,
जो सबैन, हेवूड, चोमस्कीलाही शक्य वाटला नसेल!
पण शेवटी ' अभ्यास ' एवढ्यातंच आघाडीचा अंत नव्हता,
तर त्याहूनही पुढे जाऊन तिने बरंच काही दिले आम्हाला...
तिथे प्रत्येकाला नित्या मध्ये एक अस्सल मित्र मिळाला,
भाऊ मध्ये आपल्यातला एक विचारवंत आणि अभ्या मध्ये मोठा भाऊ मिळाला.
मला स्वतःला तरी या सगळ्यात खूप काही मिळालं,
पुढं साथ मिळाली बंगांच्या हुशारीची, शेहेनशाहाच्या खंबीरपणाची.
आणखीही होतं तेव्हा कोणी, ज्यांनी उमेद जागी ठेवली
जगण्याची, लढण्याची...स्वप्नं बघत रहाण्याची.
म्हणावं तर अजून दोन वर्षंही पूर्ण नाही झालीत आघाडीला.
पण या छोट्याशा काळातच जमलाय आठवणींचा मोठा खजीना.
त्या खजिन्यात मग कधी मावशींच्या तेलकट भाज्या आहेत, कधी आहे पुरणपोळ्यांचा गोडवा
आणि आहे त्यात ' सुख-दुःखात ' वाटून खाल्लेला पाव किलो आम्रखंडाचा डब्बा.
त्यात ' चिमणरावांचं चर्हाट ' आहे, आहे ' बंग स्पेशल ' अलं घातलेला चहा,
शेहेनशहाचा ' बलून-गेम ', अभ्याची लुंगी अन् आहे भाऊचा ' गौबा',
तासाभरात पाहिलेला रायगड आहे, आहेत दुर्गा टेकडीवरच्या फेऱ्या
अन् आहेत पहाटे पाच पर्यंत मारलेल्या पाकिस्तानवरच्या गप्पा!
...खंत आज एकाच गोष्टीची वाटते
कि आम्ही इथ एकत्र आलो एका वाईट परीक्षेसाठी
प्रत्येकाच्या उभ्या आयुष्याची दिशा
जिथं ठरते तोळा-माश्याच्या फरकानी!
माझ्याच यशामुळे इथल्या काहींपासून दुरावतोय मी
... आणि काहींबद्दलचे माझे वेडे प्रयत्न तर कधीचे अपयशी ठरलेत
स्वतःची एवढीच समजूत मी काढू शकलो आहे,
की अपयशात तर मी कोसळलो होतोच- यशातही बहुदा मी कमी पडलो असेन...
.
.
.
पण फार इमोशनल नको व्हायला- हे तर सुरूच रहाणार
यश आपल्या मागे धावतच राहणार - आणि आपण अपयशामागे...
निश्चित गोष्ट मात्र एवढीच, कि जिथं नावातच आहे ' आघाडी ',
तिथ सगळ्यावर मात करणं कधीही सोपं जाणार आहे.
आज/ उद्या बाहेर पडताहेत इथले कार्यकर्ते यशाच्या निरनिराळ्या वाटांवर
कोणत्याही प्रदेशात ते असोत, अख्ख्या देशात त्यांचं कार्य गाजेल!
कोणास ठाऊक उद्या प्रशासन, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरणात येणाऱ्या
नवीन कल्पनांचा उगम इथल्याच किचनच्या कट्टयावर झालेला असेल!
...तर मग अशीही ' काळेवाडी आघाडी'
उन, वारा, पाऊस अन् स्वाईन फ्लूतही उभी आहे.
येणाऱ्या रिकाम्याला ती बरंच काही देवून पाठवते
हीच तिची खरी खुबी आहे!
तर सादर करीत आहोत, अभिषेक चौधरी प्रकाशित, मैत्रेय कुलकर्णी लिखित 'आघाडीतले दिवस'...
अजूनही आठवते डांगे चौकातली ती पहाट
एका मिणमिणत्या दिव्याखाली बस सोडून गेली होती.
कुठूनसा येऊन अभ्या उचलून घेवून गेला होता
एका अफाट अध्यायाची ती सुरुवात होती.
"B -१०२, निसर्ग सृष्टी" हा पत्ता तेव्हा देखील
डाक घरावर सोपस्कार म्हणूनच उरला असावा.
राज्यशास्त्रावर राज्य गाजवलेल्या त्या ' काळेवाडी आघाडी' त
माझा आधी बाहेरून पाठिंब्याचा, मग सदस्यत्वाचा योग होता.
फाट्यापासून गुड मॉल - आणि तेथूनही मैलभर आत
वाटेत नित्याचा प्रिय लौंड्रीवाला, गेट आणि स्विमिंग पुला भोवतीची सोसायटी.
शेकडो वेळा तुडवलेली ही वाट- कधी क्लाससाठी, कधी भाजीसाठी, कधी भज्यांसाठी
कधी राजस्थान्याच्या डाळ-वाटीसाठी आणि जवळपास रोज कोपऱ्यावरील बदाम शेकसाठी.
'स्वच्छंद'पणे अभ्यास करण्याच्या या प्रशस्त ठिकाणच्या भिंतींवर
नकाशांपेक्षा मोठा आमचा 'सौंदर्याचा' कोलाजच होता!
अभ्यासाच्या जागा ठरलेल्या तरीही कोणी नुसत्या फेऱ्या मारायचा,
कोणी किचन मध्येच असायचा अन कोणी सारखा ग्यालरीत पळायचा.
तिथल्या वस्तू आणि त्यांच्या ठेवणीतही काहीतरी विशेष होतं
एकमेकांना बडवण्यासाठी एखादा फोमचा बॉल लगेच हाती लागायचा.
वॉशिंग मशीन नुसतं धिंगाणा घालायचं, दही/भाजी/रसनासाठी अख्खा फ्रीज सुरु असायचा
आणि घरातल्या टोस्टरवर तर नित्याचा जीव उतू जायचा!
पण हे सगळं बाजूला सारून जेव्हा अभ्यास सुरु व्हायचा
भाऊच्या पाठीमागं जणू मार्क्सच उभा राहायचा!
अभ्या मग प्रतिहल्ला चढवायचा, मी-नित्या नसते फंडे मारायचो..
आणि विं.दां.च्या कवितांनी भाऊ मैफिलीत ' जान ' आणायचा!
नित्या-अभ्याच्या वाद-प्रतिवादाचा आनंद
मी, भाऊ, शेहेनशहा , बंगांनी अनेकदा घेतला असेल.
' पॉलीटिकल थेरी ' मध्ये आम्ही इतका दंगा घातलाय,
जो सबैन, हेवूड, चोमस्कीलाही शक्य वाटला नसेल!
पण शेवटी ' अभ्यास ' एवढ्यातंच आघाडीचा अंत नव्हता,
तर त्याहूनही पुढे जाऊन तिने बरंच काही दिले आम्हाला...
तिथे प्रत्येकाला नित्या मध्ये एक अस्सल मित्र मिळाला,
भाऊ मध्ये आपल्यातला एक विचारवंत आणि अभ्या मध्ये मोठा भाऊ मिळाला.
मला स्वतःला तरी या सगळ्यात खूप काही मिळालं,
पुढं साथ मिळाली बंगांच्या हुशारीची, शेहेनशाहाच्या खंबीरपणाची.
आणखीही होतं तेव्हा कोणी, ज्यांनी उमेद जागी ठेवली
जगण्याची, लढण्याची...स्वप्नं बघत रहाण्याची.
म्हणावं तर अजून दोन वर्षंही पूर्ण नाही झालीत आघाडीला.
पण या छोट्याशा काळातच जमलाय आठवणींचा मोठा खजीना.
त्या खजिन्यात मग कधी मावशींच्या तेलकट भाज्या आहेत, कधी आहे पुरणपोळ्यांचा गोडवा
आणि आहे त्यात ' सुख-दुःखात ' वाटून खाल्लेला पाव किलो आम्रखंडाचा डब्बा.
त्यात ' चिमणरावांचं चर्हाट ' आहे, आहे ' बंग स्पेशल ' अलं घातलेला चहा,
शेहेनशहाचा ' बलून-गेम ', अभ्याची लुंगी अन् आहे भाऊचा ' गौबा',
तासाभरात पाहिलेला रायगड आहे, आहेत दुर्गा टेकडीवरच्या फेऱ्या
अन् आहेत पहाटे पाच पर्यंत मारलेल्या पाकिस्तानवरच्या गप्पा!
...खंत आज एकाच गोष्टीची वाटते
कि आम्ही इथ एकत्र आलो एका वाईट परीक्षेसाठी
प्रत्येकाच्या उभ्या आयुष्याची दिशा
जिथं ठरते तोळा-माश्याच्या फरकानी!
माझ्याच यशामुळे इथल्या काहींपासून दुरावतोय मी
... आणि काहींबद्दलचे माझे वेडे प्रयत्न तर कधीचे अपयशी ठरलेत
स्वतःची एवढीच समजूत मी काढू शकलो आहे,
की अपयशात तर मी कोसळलो होतोच- यशातही बहुदा मी कमी पडलो असेन...
.
.
.
पण फार इमोशनल नको व्हायला- हे तर सुरूच रहाणार
यश आपल्या मागे धावतच राहणार - आणि आपण अपयशामागे...
निश्चित गोष्ट मात्र एवढीच, कि जिथं नावातच आहे ' आघाडी ',
तिथ सगळ्यावर मात करणं कधीही सोपं जाणार आहे.
आज/ उद्या बाहेर पडताहेत इथले कार्यकर्ते यशाच्या निरनिराळ्या वाटांवर
कोणत्याही प्रदेशात ते असोत, अख्ख्या देशात त्यांचं कार्य गाजेल!
कोणास ठाऊक उद्या प्रशासन, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरणात येणाऱ्या
नवीन कल्पनांचा उगम इथल्याच किचनच्या कट्टयावर झालेला असेल!
...तर मग अशीही ' काळेवाडी आघाडी'
उन, वारा, पाऊस अन् स्वाईन फ्लूतही उभी आहे.
येणाऱ्या रिकाम्याला ती बरंच काही देवून पाठवते
हीच तिची खरी खुबी आहे!
Subscribe to:
Posts (Atom)