Wednesday, December 1, 2010

काळेवाडीचे बुद्धिबळ




काळेवाडी आघाडीत बुद्धिबळ हा खेळ फार आवडीने खेळला जातो. कोणाला त्यातील 'बुद्धी' आवडते तर कोणाला 'बळ' तर काहींना उगाचच आवडतो.

सुरुवात नानगुडे पाटील-देशमुखांपासून करूयात. यांना केवळ 'पाटील' म्हटलेले आवडत नाही, त्यामुळे 'पाटील-देशमुख' असे double barrel लावाव लागत. असो. तसे निखील नानगुडे पाटील देशमुख आणि बुद्धिबळ हे विरुद्धार्थी शब्द. ह्या नावाला शोभणारे खेळ म्हणजे कुस्ती, मुष्टियुद्ध किंवा मारामारी!! बुद्धिबळ आणि यांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे 'बळ'. ते कशाचेही असले तरी चालेल असे म्हणून ह्यांनी पट मांडला. पाटलांची आवडती सोंगटी म्हणजे 'हत्ती'. त्याचा आकार, शक्ती, सरळ चाल सगळेच ह्यांना प्रिय. पटावरच्या बाकी सोंगट्या मग तो राजा असूद्यात किंवा वजीर हे सगळे बिनकामी आहेत, असे पाटलांचे ठाम मत आहे. ह्यांच्या मते पटावरच्या अक्ख्या ३२ सोंगट्या हत्तीच्याच जाती असाव्यात. मग काय, नुसती हाणामारी, मारधाड आणि ती पण समोरासमोर! यांचा खेळतानाचा आवेश भयंकर असतो. त्याची नुसती झलक हवी असेल तर लगान मधला 'बाघा' आठवा. अगदी युद्धभूमीवरची वीरश्री संचारते. 'हान त्या घोड्याला', 'तोड तांगडे त्या उंटाचे', 'टाक चिरडून त्या प्याद्याला' आणि हे सगळे फक्त हत्तीनेच केले पाहिजे हा नियम. प्रत्येक चालीत हाणामारी हवीच. 'We make our own roads' म्हणत अगदी सरळ बघत सदा स्वारीवरच असतात. कधी कधी उंटासारखे तिरपे कटाक्ष टाकून प्रेक्षणीय स्थळ न्याहाळतात, पण लगेच ह्यांच्या कानात म्हणे हनुमान 'चालीसा' सुनावतात. कोणास ठाऊक कानात वाजते का कानाखाली वाजते. तर असे हे आमच्या काळेवाडीचे दणदणीत शूरवीर सरदार.

झोरदार ना!! आत क्रांतिकारी खेळपद्धती कडे वळूयात. सर्वप्रथम 'लाल सलाम'. सलामाचे खरे मानकरी आहेत अनिकेत भावठानकर उर्फ Martin 'Latur' king उर्फ मराठवाड्याचे Marx उर्फ Kalewadi proletariat . तूर्तास फक्त भाऊ. यांना मुळी ह्या खेळाची संकल्पनाच मान्य नाही. काळा राजा, पांढरा राजा, यांच्यातील ही लढाई हा सगळा श्रीमंताचा कट आहे असे यांचे म्हणणे आहे. समाज दोन गटात विभागलेला असतो खरा, पण बुद्धीबळातल्या सारखा नाही. एक गट असतो तो Bourgeois लोकांचा, म्हणजे राजा, वजीर, घोडा, उंट यांचा. तर दुसरा केवळ Proletariat प्याद्यांचा. भाऊच्या 'historic analysis ' नुसार या खेळत रक्त फक्त प्याद्यांचेच सांडले जाते आणि ते पण राजासाठी. त्यामुळेच भाऊने क्रांतिकारी संकल्पना मांडली आहे - 'विद्रोही बुद्धिबळाची'. यात एका बाजूला असतील bourgeois तर दुसऱ्या बाजूला proletariat प्यादी. यात bourgeois चा रंग कुठला पण चालेल पण प्याद्यांचा रंग फक्त लालच हवा. यातून भाऊला एक रक्तरंजित क्रांती अपेक्षित आहे. यातून प्याद्यांचे राज्य निर्माण होईन आणि खेळाची काही गरजच उरणार नाही. हा रक्तरंजित क्रांतीचा प्रकार सरदार नानगुडेना फारच आवडला कारण, मारामारी!!
सीमावर्ती बेळगावच्या मैत्रेय कुळकर्णीला वजिराचा भारी राग. त्याच्या खेळण्यातले स्वारस्य म्हणजे पटावरच्या दोन राण्या, मग ती काळी असो व गोरी. या इसमाची थोडक्यात ओळख म्हणजे याचे आतापर्यंत ३६ लफडी, २७ प्रकरणं, १२ इंग्रजीतल्या commitments झाली आहेत. सध्या १ engagement होऊ घातली आहे. अंदाज आलाच असेल. गोड गोड बोलून अख्खा पट फिरवतो. राण्यांच्या जितके जवळ जातं येईन तेवढे जातो. मग त्यासाठी प्यादी मरोत अथवा राजा. याला त्यांच्याशी काहीही घेणे-देणे नाही. याचे ध्येय एकच - राणी, क्षमा करा राण्या! सध्या यांनी असाच एक पट मसुरीत मांडला आहे. आणि लवकरच युगांडा आणि बुर्कीना फासो येथे मांडणार आहेत.
या सगळ्यांच्या उलट स्वच्छंद खेळणारा पवन बढे. नावासारखाच मुक्त, स्वच्छंद! हा एकचाल पुण्यात खेळतो तर दुसरी चाल हरिश्चंद्र गडावरून, तिसरी लडाखला ..... शंभरावी अरुणाचल प्रदेशातून .... एक सहस्त्रावी निलगिरी पर्वतावर. हा असाच खेळत राहतो. याचे खेळायचे नियम म्हणजे १. प्रत्येक चाल bike वर बसूनच खेळणार. २. पायात sport shoes पाहिजेतच. ३. हातात जळणारी काडी आवश्यकच. ४. खेळत असंख्य राण्या हव्यात. इत्यादी इत्यादी. बऱ्याच चाली Jet Stream सारख्या झिंगत-विळखे घेत असतात. पण हा कोणालाही हरवत नाही आणि जिंकवत पण नाही. त्यामुळे पटावरचे सोंगटी खूष! त्यातल्या त्यात राण्या जास्तच खूष. म्हणजे हा ठेवतो त्यांना, एकदम आल्हाद. सध्या हा मुक्त वारा पण कुळकर्ण्याच्या गोड गोड बोलण्यात फसून विरक्तीच्या मार्गाला आहे असे ऐकिवात आहे. म्हणजे कुलकर्ण्यांनी पट मोकळा करून घेतलेला दिसतोय.




अभिजित गुरव. राजा माणूस. अगदी खऱ्याखुऱ्या राजाला शोभून दिसणारे व्यक्तिमत्त्व. तोच रुबाब! तीच मिजास! तोच भारदस्त पणा! तोच डौल! तरुणींच्या काळजाचा ठेका चुकवणाऱ्या मिश्या!! ( ह्याच मिश्यांना पाहून म्हणे काझीरंग्यातल्या एक शिंगी गेंड्याने पळ काढला होता. त्यावेळेस राजे हत्तीवर विराजमान होते. गेंडा नक्की मिश्यांना घाबरला का हत्तीला यावर इतिहासकारांमध्ये अजूनही वाद चालू असल्याचे ऐकिवात आहे). असो. जहांपन्हा जेंव्हा बुद्धिबळ खेळतात तेंव्हा पटावर एकच राजा असतो, दस्तुरखुद्द जहांपन्हा!! यांच्या चाली अगदी पटावरच्या राजासारख्याच. एक चाल पुढे, एक मागे, एक उजवीकडे, एक डावीकडे! चाल जरी एका घराची असली तरी नजर ६४ घरांवर गिरक्या घेत असते. सावज हळूच टिपत असते. मग चाली रचल्या जातात. अख्खा पट गदागदा हलायला लागतो. सारा पट मग यांच्यासाठीच लढतो, जिंकतो आणि हरतो देखील. संपूर्ण पाटावर यांचीच हुकुमत! जहांपन्हांच्या नजरेचा एकेक कटाक्ष हत्ती, वजीर, घोडे, प्यादे यांना 'बेहोश' करून सोडतो. याच बेहोशीत सोंगटी जिंकतात, शत्रू नामोहरम होतो. इतका की पराभवात ही तो आत्मज्ञानाने नाचायला लागतो. मृत्यूसमीपही सोंगट्याना आत्म्याचा शोध लागतो. त्यांची शरीरे केंव्हाच डब्ब्यात जाऊन पडलेली असतात, आत्मा मात्र अनंतात विलीन होऊन स्वर्गाकडे प्रस्थान झालेला असतो. जिंकणारे पण असेच 'धुंद' होतात. त्यांना ना विजयोन्माद असतो ना आसुया. जहांपन्हांच्या सान्निध्यात सगळ्यांनाच ब्रम्हानंदी टाळी लागते. तर असे हे आमचे प. पू. ह. भ. प. अभिजित राजे!!

कोल्ह्यासारखे धूर्त, लांडग्यासारखी लबाडी, मैत्रेय इतकाच गोडबोल्या, जहांपन्हांचीच मिजास! अंदाज आलाच असेल. हो तोच तो. नितीन येवला साहेब उर्फ नाशिकचे Dy SP . ह्यांच्या धूर्तपणाचे अनेक वेगवेगळे किस्से अनेक वेगवेगळ्या लोकांना माहित आहेत. यांचे जर संकलन केले तर IIMA 'Reliance ' किस्से सोडून ह्यांचेच पराक्रम 'case study ' म्हणून शिकवतील. असो. तसा ह्यांना बुद्धिबळात खेळात रस नाही. पण लोकाग्रहाखातर आपल्या बुद्धीची चुणूक दाखवण्यासाठी मांडतात पट ! मग सुरु होतो एक असामान्य खेळ. 'creative destruction ' फेम भगवान श्रीकृष्ण, द्यूताचा महारथी शकुनी, 'ध.मा.' आनंदीबाई, शेकसपीअरच्या ऑथेल्लो मधला इआगो किंवा ओंकाराचा 'लंगडा त्यागी', बारा मती फिरवणारे साहेब, matrix चा agent Smith सगळेच आवासून खेळ बघतात. सोंगट्या, प्रेक्षण सारेच गोंधळून जातात. सोंगट्या म्हणतात आपण खेळतोय नक्की कोणासाठी. प्रेक्षण म्हणतात काळा वजीर पांढऱ्या राजाला सोडून काळ्याच राजाला का 'चेक' देतोय? सोंगटी, प्रेक्षक गरगरतात. खेळ रंगतदार अवस्थेत पोहचतो. असंख्य बळी जातात, असंख्य विमनस्क होतात. निकाल काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण ह्यांच्या पटाचे निकाल इतक्या लवकर कळतच नाहीत. ती कळायला तितकेच असामान्यत्व लागते किंवा काळच काही दिवसात सारे काही स्पष्ट करतो. श्रीकृष्णाला तरी कुठे अंदाज होता त्याने रचलेल्या गीतेतून महाभारत घडेल आणि घडतच राहील! सध्या हे दिल्लीत काहीतरी वेगळीच 'गीता' रचत आहेत, बघुयात कलियुगात काय महाभारत घडवतात ते!

नुकताच काळेवाडी आघाडीत एक चंचुप्रवेश झालं. गोदावरीच्या कुशीतल्या गोंडवन भागाचा शिवकुमार उर्फ शिवा. सध्या तरी हा काळेवाडी बुद्धिबळात नवीन आहे, त्यामुळे याचा वावर प्याद्या सारखा असतो. पण बाज असा की अगदी राजा सुद्धा ह्याचे रक्षण करण्यात मागे-पुढे पाहायचा नाही. हळू हळू हे प्यादे एकेक घर पुढे जात आहे. ७ घरे ओलांडून हा वजीर होणार, हे निश्चित!

इति श्री काळेवाडी बुद्धिबळ आख्यान संपन्नम!!