तसा हा ब्लोग उघडून बरेच दिवस झाली. पण विषय सापडत नव्हता. कशापासून चालू करावे? आलेल्या अनुभवांनी का UPSC च्या गमती जमातींनी, का मार्गदर्शन ब्लोग म्हणून! अर्थात मार्गदर्शनासाठी महामहीम नितीन येवला आणि मैत्रेय कुलकर्णी यांनाच पाचारण करावे लागले असते. कारण या दोघानीच काळेवाडी आघाडीला अगदीच वैश्विक नाही पण 'काहीतरी' स्वरूप दिले आहे. आत 'काहीतरी' चा अर्थ पुणेरी घेऊन नये. काळेवाडी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, म्हणजे मी अभिषेक मधुकर चौधरी, परभणीचे असल्यामुळे त्याचा अर्थ सरळ सरळ घ्यावा. पण पुणेरी प्रभाव मात्र लक्षात घ्यावा. असो. तर ब्लोग चा शुभारंभाचा प्रश्न कुलाकर्ण्यानीच सोडवला... आपल्या खास शैलीत आपले 'काळेवाडी' दिवस त्यांनी रंगवले आहेत. तरी काळेवाडी आघाडीच्या तमाम चाहत्यांनी याचा आस्वाद घ्यावा व असेच आपले उदंड आशीर्वाद आघाडीला द्यावेत...
तर सादर करीत आहोत, अभिषेक चौधरी प्रकाशित, मैत्रेय कुलकर्णी लिखित 'आघाडीतले दिवस'...
अजूनही आठवते डांगे चौकातली ती पहाट
एका मिणमिणत्या दिव्याखाली बस सोडून गेली होती.
कुठूनसा येऊन अभ्या उचलून घेवून गेला होता
एका अफाट अध्यायाची ती सुरुवात होती.
"B -१०२, निसर्ग सृष्टी" हा पत्ता तेव्हा देखील
डाक घरावर सोपस्कार म्हणूनच उरला असावा.
राज्यशास्त्रावर राज्य गाजवलेल्या त्या ' काळेवाडी आघाडी' त
माझा आधी बाहेरून पाठिंब्याचा, मग सदस्यत्वाचा योग होता.
फाट्यापासून गुड मॉल - आणि तेथूनही मैलभर आत
वाटेत नित्याचा प्रिय लौंड्रीवाला, गेट आणि स्विमिंग पुला भोवतीची सोसायटी.
शेकडो वेळा तुडवलेली ही वाट- कधी क्लाससाठी, कधी भाजीसाठी, कधी भज्यांसाठी
कधी राजस्थान्याच्या डाळ-वाटीसाठी आणि जवळपास रोज कोपऱ्यावरील बदाम शेकसाठी.
'स्वच्छंद'पणे अभ्यास करण्याच्या या प्रशस्त ठिकाणच्या भिंतींवर
नकाशांपेक्षा मोठा आमचा 'सौंदर्याचा' कोलाजच होता!
अभ्यासाच्या जागा ठरलेल्या तरीही कोणी नुसत्या फेऱ्या मारायचा,
कोणी किचन मध्येच असायचा अन कोणी सारखा ग्यालरीत पळायचा.
तिथल्या वस्तू आणि त्यांच्या ठेवणीतही काहीतरी विशेष होतं
एकमेकांना बडवण्यासाठी एखादा फोमचा बॉल लगेच हाती लागायचा.
वॉशिंग मशीन नुसतं धिंगाणा घालायचं, दही/भाजी/रसनासाठी अख्खा फ्रीज सुरु असायचा
आणि घरातल्या टोस्टरवर तर नित्याचा जीव उतू जायचा!
पण हे सगळं बाजूला सारून जेव्हा अभ्यास सुरु व्हायचा
भाऊच्या पाठीमागं जणू मार्क्सच उभा राहायचा!
अभ्या मग प्रतिहल्ला चढवायचा, मी-नित्या नसते फंडे मारायचो..
आणि विं.दां.च्या कवितांनी भाऊ मैफिलीत ' जान ' आणायचा!
नित्या-अभ्याच्या वाद-प्रतिवादाचा आनंद
मी, भाऊ, शेहेनशहा , बंगांनी अनेकदा घेतला असेल.
' पॉलीटिकल थेरी ' मध्ये आम्ही इतका दंगा घातलाय,
जो सबैन, हेवूड, चोमस्कीलाही शक्य वाटला नसेल!
पण शेवटी ' अभ्यास ' एवढ्यातंच आघाडीचा अंत नव्हता,
तर त्याहूनही पुढे जाऊन तिने बरंच काही दिले आम्हाला...
तिथे प्रत्येकाला नित्या मध्ये एक अस्सल मित्र मिळाला,
भाऊ मध्ये आपल्यातला एक विचारवंत आणि अभ्या मध्ये मोठा भाऊ मिळाला.
मला स्वतःला तरी या सगळ्यात खूप काही मिळालं,
पुढं साथ मिळाली बंगांच्या हुशारीची, शेहेनशाहाच्या खंबीरपणाची.
आणखीही होतं तेव्हा कोणी, ज्यांनी उमेद जागी ठेवली
जगण्याची, लढण्याची...स्वप्नं बघत रहाण्याची.
म्हणावं तर अजून दोन वर्षंही पूर्ण नाही झालीत आघाडीला.
पण या छोट्याशा काळातच जमलाय आठवणींचा मोठा खजीना.
त्या खजिन्यात मग कधी मावशींच्या तेलकट भाज्या आहेत, कधी आहे पुरणपोळ्यांचा गोडवा
आणि आहे त्यात ' सुख-दुःखात ' वाटून खाल्लेला पाव किलो आम्रखंडाचा डब्बा.
त्यात ' चिमणरावांचं चर्हाट ' आहे, आहे ' बंग स्पेशल ' अलं घातलेला चहा,
शेहेनशहाचा ' बलून-गेम ', अभ्याची लुंगी अन् आहे भाऊचा ' गौबा',
तासाभरात पाहिलेला रायगड आहे, आहेत दुर्गा टेकडीवरच्या फेऱ्या
अन् आहेत पहाटे पाच पर्यंत मारलेल्या पाकिस्तानवरच्या गप्पा!
...खंत आज एकाच गोष्टीची वाटते
कि आम्ही इथ एकत्र आलो एका वाईट परीक्षेसाठी
प्रत्येकाच्या उभ्या आयुष्याची दिशा
जिथं ठरते तोळा-माश्याच्या फरकानी!
माझ्याच यशामुळे इथल्या काहींपासून दुरावतोय मी
... आणि काहींबद्दलचे माझे वेडे प्रयत्न तर कधीचे अपयशी ठरलेत
स्वतःची एवढीच समजूत मी काढू शकलो आहे,
की अपयशात तर मी कोसळलो होतोच- यशातही बहुदा मी कमी पडलो असेन...
.
.
.
पण फार इमोशनल नको व्हायला- हे तर सुरूच रहाणार
यश आपल्या मागे धावतच राहणार - आणि आपण अपयशामागे...
निश्चित गोष्ट मात्र एवढीच, कि जिथं नावातच आहे ' आघाडी ',
तिथ सगळ्यावर मात करणं कधीही सोपं जाणार आहे.
आज/ उद्या बाहेर पडताहेत इथले कार्यकर्ते यशाच्या निरनिराळ्या वाटांवर
कोणत्याही प्रदेशात ते असोत, अख्ख्या देशात त्यांचं कार्य गाजेल!
कोणास ठाऊक उद्या प्रशासन, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरणात येणाऱ्या
नवीन कल्पनांचा उगम इथल्याच किचनच्या कट्टयावर झालेला असेल!
...तर मग अशीही ' काळेवाडी आघाडी'
उन, वारा, पाऊस अन् स्वाईन फ्लूतही उभी आहे.
येणाऱ्या रिकाम्याला ती बरंच काही देवून पाठवते
हीच तिची खरी खुबी आहे!